Friday, February 11, 2022

शिवाजी महाराज जयंती भाषण १

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा ! न काळवेळ तयांना लागे शत्रु धारातीर्थी पाडाया। स्मरता शिवरायांचे शौर्य लागे इतिहास घडाया ॥ मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता हुकूमत गाजवीत होत्या. अशा कठीण परिस्थितीत 19 फेब्रुवारी 1630 उजाडला. रोजी सोन्याचा दिवस एक तारा शिवनेरीवर चमकला, जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला, मानाचा मुजरा करते छत्रपतींना, ज्यांनी स्वराज्य रूपी भगवा झेंडा रोवला. शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली. शिवरायांना शहाजी राजांचा फारसा सहवास मिळाला नाही. जिजाऊंच्या सावलीत आणि संस्कारात बाळकडू घेत शिवरायांचे बालपण आकार घेत गेले. वयाच्या सातव्या वर्षापासून शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला त्यांनी अनेक विदया पारंगत केल्या. इ. स. 1640 मध्ये त्यांचा विवाह सईबाई यांच्या बरोबर थाटामाटात झाला व 1645 मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची घोडदौड सुरु झाली. त्याकाळी "ज्याचे किल्ले, त्याचे राज्य " हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचा श्रीगणेशा केला. नंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड, जावळी असे किल्ले एक एक करत ताब्यात घेतले.एकामागून अफजलखान, सिद्दी जोहर, दिलेरखान,शायिस्तेखान, उदयभान अशा शत्रूशी लढताना शिवरायांच्या मावळ्यांनी गनिमी काव्याने लढा दिला आणि शत्रूवर विजय मिळवला. या सर्वांच्या प्रयत्नातूच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी प्रत्यक्षात साकारले. म्हणून म्हणावेसे वाटते... अशी करारी नजर सदा गनिमा भेदूनी पाही आरपार । शिवरायांमुळेच जाहले स्वप्न स्वराज्याचे साकार ॥ बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय ! जय भवानी, जय शिवाजी

No comments:

Post a Comment