Sunday, November 17, 2019

वाबळेवाडीची शाळा....प्रेरणादाई अनुभव.


वाबळेवाडीची शाळा....प्रेरणादाई अनुभव.

वाबळेवाडीच्या शाळेबद्दल सुपर थर्टी व सोशियल माध्यमातून वेगवेगळ्या शाळांच्या भेटीच्या वृत्तांतातून वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप इच्छा आणि उत्सुकता होती.तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती.तिथल्या मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं होतं.त्यानुसार शिक्षणाधिकारी मा वीर मॅडम यांच्या मुळे शाळेला भेटीचा योग जुळून आला.त्या भेटीचा हा सविस्तर  वृतांत.
               स्वप्नवत वाटणारी वाबळेवाडी शाळेच्या भेटीसाठी सुपर थर्टीच्या सर्व सदस्यामध्ये प्रचंड उत्सुकता, आनंद व आतुरता निर्माण झाली होती.ठरलेल्या नियोजनाप्रमाणे भल्या पहाटे सव्वा तीनलाच घर सोडून नाशिकहुन नियोजना प्रमाणे  सर्वजण निघण्यासाठी सज्ज झालो.मा शिक्षणाधिकारी वीर मॅडम यांनी शुभेछ्या देत प्रस्तान केले. 

पाच तासांच्या प्रवासानंतर आम्ही वाबळेवाडी शाळेस पोहचलो.पण प्रवास फारसा कळला नाही कारण आस आणि ओढ  होती वाबळेवाडीची.       
वाबळेवाडी शाळेत प्रवेश करताच आमचे आनंदाने स्वागत केले.या शाळेचा भूखंड तसा लहान आहे. पण असं असताना त्या जागेचा पुरेपूर आणि प्रभावी वापर केलेला आम्ही बघत होतो.पटांगणातील जमिनीवर विशिष्ट प्रकारे काढलेले अंक आणि अक्षरं, खांबांबर असलेली, खंड,नद्या,पर्वत,ऋतू, इत्यादींची माहिती.फरशांवर आखलेली कोष्टकं, तक्ते, या सगळ्यामुळे लहान जागेतही माहितीचं मोठं भांडार मुलांसाठी भरलेलं होतं.शाळेत मुलांना यावंसं वाटण्यासाठी शाळेतलं वातावरण तसं पूरक हवं, हा वारे सरांचा विचार ठिकठिकाणी दृश्य रुपात दिसतो.

शाळेच्या सविस्तर माहिती व्हावी म्हणुन इमारतीच्या सभागृहात एकत्रित बसवत आम्हास माहिती मिळाली.आजच्या विद्यार्थ्यांना पुढील काळातील आव्हाने काय राहणार आहे.यापुढील वीस वर्षात सध्या शिकत असलेल्या मुलांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.यासाठी वाबळेवाडीच्या शाळेत कार्य सुरू आहे.जे व्हायचे आहे त्यासाठी सुरुवातीपासून तयारी ठेवत आतापासूनच कार्याला लागा असे येथील ग्रामस्थ सतीश वाबळे यांनी आम्हा शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
                   आमच्या शाळेचा स्वीडन या देशाबरोबर करार झालेला असून त्या देशा पेक्षा आपली शिक्षण व्यवस्था वीस वर्षे मागे असल्याचे त्यांनी सांगितले.वाबळेवाडीच्या शाळेत सहावीपासूनच फाउंडेशन कोर्सला सुरुवात केली असून बारावीपर्यंत या शाळेत फाउंडेशन बॅचेस घेणारी राज्यातली पहिली शाळा असल्याचे त्यांनी सांगितले.
                यावेळी अण्णानी वाबळेवाडीच्या इतिहास शिक्षकांना सांगितला.सन 2012 मध्ये 32 पट असलेली ही शाळा दत्तात्रय वारे यांनी अतिशय मेहनतीने उभी करत आज रोजी सहाशेहून अधिक विद्यार्थी सुसज्ज शाळेत शिक्षण घेत असल्याचे सांगितले.सहा-सात वर्षे दोन शिक्षकांनी या शाळेची पायाभरणी केली.गुंठ्याला दहा लाख अशी जमिनीला किंमत असताना ग्रामस्थांनी शिक्षकांच्या त्यांच्या कामावर विश्वास ठेवत दीड एकर जागा शाळेला दिली. याठिकाणी मुलं स्वतः शिकत असल्याचे त्यांनी सांगितले.
                       विषय मित्र शिक्षकांपेक्षा चांगले शिकवतात.मुलांना विचारात घेऊन काम आमच्या शाळेत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुलांच्या विचारांनीच वर्गाची रचना आम्ही ठरवल्याचे देखील यावेळी त्यांनी उपस्थितांना सांगितले. त्याच्यबरोबर प्राथमिक शाळेला पूर्व प्राथमिक वर्ग जोडत दर्जेदार शिक्षणाचे पायाभरणी अंगणवाडी तर केली जात असल्याचे व पहिली दुसरीची काम अंगणवाडी तच  पूर्ण करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
                                    कुठलाही मुलगा कोणत्याही मुलासोबत आमच्या शाळेत काम करतो.सर्व विद्यार्थ्यांना समान संधी दिली जाते.शाळेतील विद्यार्थ्यांनी ट्रेकिंगला वोटिंग मशीन,कचराकुंडी वर काम करत असल्याचे व प्रत्यक्ष विद्यार्थी कशी कृती करतात ते आम्हा शिक्षकांना सांगितले.शाळेला मदत मिळण्यासाठी गावातील सांसस्कृतीक कार्यक्रम बंद करून शाळेच्या कामासाठी पैसा दिलेत.जत्रा यात्रा सार्वजनिक गणेशोत्सव बंद करत या कार्यक्रमांसाठी खर्च होणारी संपूर्ण रक्कम गावकरी शाळेसाठी देऊ लागले आहेत.चांगली जागा निर्माण करत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला मदत करणार नाहीत हा विश्वास या शिक्षकांनी त्यांच्या कामातून गावाला दाखवल्याने भरीव अशी मदत गावाने शाळेला दिल्याचे त्यांनी सांगितले.
                                    या शिक्षकांनी लोक शाळेत आणण्याचे काम विविध उदाहरणांनी त्यांनी दाखवून दिले.देशाच्या विकासाची सुरुवात शाळेपासून होते म्हणून गावाचे शाळेसाठी योगदान शाळेचे बांधकाम लोकसहभागातून केल्याचे सांगितले.ह्या शाळेच्या संपूर्ण वर्गखोल्या २२ फूट रुंद  २२ फूट लांब.तसेच १४ फूट उंचीच्या पालक,ग्रामस्थ, स्वीडनच्या बॅंक ऑफ मेलॉनच्या सहकार्यातून निधी उपलब्ध करून शाळेस आठ वर्गखोल्या पूर्ण पर्यावरणपूरक बांधल्या आहेत. आणि विशेष म्हणजे एकाही वर्गात बेंच पहायला मिळाले नाहीत.
                        या अत्याधुनिक इमारतीवरून वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे व्यवस्था करण्यासाठी शाळा बांधकाम पूर्वीच शालेय इमारतीखाली दीड लक्ष पाणीसाठा होऊ शकेल एवढ्या पाण्याच्या टाक्या तयार केल्याचे साबळे अण्णा यांनी सांगितले. मुलं शाळेत सकाळी लवकर येतात आणि मोकळेपणाने वावरणं शिकणं सुरू असतं. या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने शिक्षणाची सुरुवात केल्याचे देखील त्यांनी सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांना संगीत विशारद,कोडींग प्रोग्राम,वेद हे शिक्षण व वेगळ्या संधी या शाळेत मिळत असल्याचे सांगितले.एका विषयातून अनेक विषय शिकवायचे यासाठी देखील ते वेगवेगळे प्रयोग करत असल्याचे सांगितले.उदाहरणादाखल कुटुंबातील कुटुंब वत्सल पणा व नाती कळणं हे मुलांना गरजेचे आहे.म्हणुन मी आणि माझे कुटुंब या उपक्रमातून आम्ही हे संस्कार विद्यार्थ्यांवर करत असल्याचे सांगितले. कुटुंब कळालं की कुठल्याच मुलाच्या आई,वडील,आजी,आजोबा आधार आश्रमात जाणार नाहीत हे संस्कार रुजवण्यासाठी आम्ही हा उपक्रम शाळेत राबवत असल्याचे सांगितले.
 
                  विद्यार्थ्यांना संधी दिली.सगळे विषय मुलांना दिलेत.ह्या विद्यार्थ्यांमधून संशोधक निर्माण व्हावेत यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू असल्याचे देखील सांगितले.मुलाचा कल शोधला व संधी उपलब्ध करून देत नवनवीन ज्ञान ,कौशल्य शाळेत मुलांना देण्यासाठी शिक्षक तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्याचबरोबर शिक्षकाने प्रत्येक शिक्षक जोपर्यंत शाळेकडे आई म्हणून पाहात नाही.तोपर्यंत शाळेचे प्रश्न  सुटणार नसल्याचे दाखला त्यांनी दिला.शाळेकडे पाहतांना शिक्षकांची भूमिकाही आईची असली पाहिजे.ही भुमिका शिक्षकाची असली तरच मुलाला काय अपेक्षित आहे.हे शिक्षकांना कळणार हे त्यांनी विविध उद्धारनानी सांगितले.
                    स्वयं  अध्ययनाची सवय जोपर्यंत मुलात निर्माण होत नाही.तोपर्यंत मुल स्वता काही शिकू शकत नाही.म्हणून मुलं स्वयं अध्यापन करतील  यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.फाउंडेशन प्रोग्रामच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झालेले विद्यार्थी या शाळेत शिक्षक आहेत.या शिक्षकांचा पगार गावकरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.शाळेचे शिक्षक सचिन बेंडभर हे  विद्यार्थ्यांना जापनीज  व फ्रेंच भाषा त्याचबरोबर इतर भाषा शिकवत आहेत.









          शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहार मिळावा यासाठी  खैरे सर  मुलांना रोज आरोग्याच्या दृष्टीने  कोणता घटक शरीरास अधिक गरजेचा आहे.असा पोषक आहार कोणता असावा यासाठी सर्व पालकांना मेसेज पाठवतात.त्याचबरोबर शाळेत ज्याचं मूल आहे त्याला शा पो आहार शिजवायचं काम दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे पिझ्झा बर्गर खाणाऱ्या पालकांच्या मुलांनी त्यांच्या कुटुंबातून पिझ्झा-बर्गर हद्दपार केला ते देखील सांगितले. वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा.आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. चॉकलेट एवजी आम्ही विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या दिवशी गुळ शेंगदाणा चिक्की खारीक हे शरीराच्या दृष्टीने पोषक घटक वाटायला लावतो.त्याचबरोबर शिक्षकाने रोज नवीन कल्पना विद्यार्थ्यांना द्याव्यात.स्वतःची बुद्धी वापरून शाळेत शिकवावं.त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषा शिकणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
                       वाबळेवाडीतील फक्त 50 ते 55 विद्यार्थी आहेत.अडीचशे-तीनशेच्या एवढी  लोकसंख्या असलेल्या वस्तीवरील शाळेत आजूबाजूच्या 23 गावातील विद्यार्थी याठिकाणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. आठवड्यातील एक दिवस विद्यार्थी शाळा चालवतात.शाळेतील आठवीतील सनिया या विद्यार्थिनीने आम्ही रोबोटच्या कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.शाळेतील 3d प्रिंटर,लेजर कटर,कोडींग लँग्वेज यासह सुसज्ज ग्रंथालय व त्यातील जालणारे उपक्रम सांगितले.
             पूर्व प्राथमिक वर्ग प्राथमिक शाळेला जोडलेले असल्याने ह्या इयत्ता पहिलीच्या वर्गात पूर्व प्राथमिकच्या वर्गातील बाईंशी, मुलांशी आम्ही बोलत होतो.तेंव्हा मुल दोन मात्र्याचे शब्द करत होते.पहिलीची तयारी बालवाडीतच झाल्याने अवाक व्हायला लागले. त्या मुलांचा धीटपणा बघून खूश व्हायला होत होतं.पूर्व प्राथमिकच्या बाई सांगत होत्या, 'आम्ही मुलांना कसलंही दडपण देतच नाही मुळी हे विशेष वाटलं. पूर्व प्राथमिक वर्गाला लागूनच असलेलं शाळेचं स्वयंपाकघर इतकं नीटनेटकं होतं, की विश्वास बसत नव्हता. इथे एक गोष्ट सतत जाणवत होती ती म्हणजे कमालीची स्वच्छता.
          वर्ग पहातांना विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषा डेव्हलप केल्याचे प्रात्यक्षिकातून सांगितले.पहिलीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांनी मंथन तसेच वेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचे जाणवले.दुसरीच्या वर्गात संख्याज्ञान 15 ते 23 अंकी संके पर्यंत विद्यार्थी त्यांच्या स्थानिक किंमत तसेच व्यवहारिक ज्ञान करत असल्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.या वर्गातील सगळीच मुलं कविता करत असल्याचे निदर्शनास आले.विद्यार्थ्यांच्या 100 कवितांचं परिशस्पर्श हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध करत असल्याचे त्यांनी सांगितले.कविता कशी तयार करावी.विद्यार्थ्यांची शब्दसाठा कसा वाढवावा यासाठीचे उपक्रम त्यांनी सांगितले. मयंक मगर या विद्यार्थ्यांनी नाट्यछटा उपस्थितांना करून दाखवली.ब्राह्मी लिपी लेणी मधली भाषा अंकांचा सराव कृतीवर भर विषय मित्र ह्या बाबी या वर्गात पहावयास मिळालं.उत्साह, आणि आत्मविश्वास हे दोन गुण प्रत्येक गोष्टीत इथली मुलं दाखवत होती.
                       
 हे वर्ग पहातांना जेवणाची सुट्टी होती.त्यावेळी मैदानावर आपल्याला कळलेलं आणि दुसर्‍याला न जमणारं असं सगळं त्याला स्वतःहून मुलं समजवून सांगताना मी पहिलीत.नेतृत्वगुण, व्यवस्थापन वगैरे कुठल्याही संज्ञा ठाऊक नसलेली मुलं हे सगळं आत्मसात केलेले मैदानावर पहिलीत.कबड्डी खेळतानाही मुलांमधला जोश बघून मी अनेक ठिकाणी मागे सरलो.मुलांचं असणारं लक्ष, पडणारे प्रश्न, त्यांनी दिलेली उत्तरं हे सगळं खूप छान होतं.काही मुल बॅडमिंटन खेळतानाही पहिला.
        
इथे विद्यार्थ्यांना शक्य असलेली प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून दिलेली दिसली.अनेक पुस्तकं,जवळजवळ प्रत्येक खेळासाठी लागणारी उपकरणं,अनेक वाद्यं, वैज्ञानिक उपकरणं,टॅबलेट्स,कॉम्प्यूटर असं सगळं या शाळेत आहे.वारे गुरजी म्हणाले, 'गोल्फ सोडून सगळ्या खेळांचं साहित्य इथे आहे. मुलांना सगळं काही उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.इथली मुलं अनेक खेळांमधे आणि कलांमधे पारंगत आहेत आणि त्याचं बरंचसं श्रेय वारे सरांना जातं.हे मोठ्या जिद्दीचं आणि त्याहूनही जास्त आत्मीयतेचं उदाहरण वारे सरांच्या रुपात या शाळेत आहे.
            दत्तात्रेय वारे गुरुजीचा  शाळा उभारण्यासाठी चा प्रवास  


त्यांतर शाळेच्या मुख्य सभागृहात दत्तात्रेय वारे गुरुजीनी शाळा उभारण्यासाठी चा प्रवास  या वेळेस सर्व उपस्थितांना सांगितला.शाळा उभारणीसाठी चळवळ म्हणून ग्रामस्थांनी काम केले.प्रत्येक ग्रामस्थाच्या दैनंदिनीत शाळेसाठी योगदान हे काम रोजचेच ठरलेले असल्याने त्यांनी सांगितले.वाबळेवाडी वर अलौकिक असामान्य उभ करण्यासाठी ग्रामस्थांचा मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितलं.ज्याला उत्तर आहेत. त्याला प्रश्न म्हणायचं.आणि असे प्रश्न आम्ही सहज सोडत असल्याने लोकांचा आमच्या कामावरचा विश्वास वाढला आणि हाच विश्वास आम्ही कधीही कमी होऊ दिला नाही.
            शिक्षकांचे मुलांवर प्रेम असले पाहिजे. शाळेवर व मुलांवर प्रेम असलं  की आपण त्याचा रात्रंदिवस विचार करतो. आणि त्याचा रात्रंदिवस विचार करतो ही आपोआप घडत असल्याचे त्यांनी सांगितलं.काम कसं करायचं.मुलांना कसं शिकवायचं व सर्व मुले एकत्र येऊ शकतात हे शिक्षकाला कळलं की आपोआप काम उभं रहात असल्याचे सांगितले.शाळेचं माध्यम मराठीच आहे, कारण आपली, मुलांची मातृभाषा मराठी आहे. परंतु पहिलीपासून हिंदी व इंग्लिश या भाषा शिकवल्या जातात आणि त्यामुळे मुलांना कुठेच भाषेची अडचण येत नाही.' याची प्रचीती जेंव्हा पूर्व प्राथमिकच्याही मुलांनी इंग्लिशमधे आपली नावं सांगितली तेंव्हा आलीच.
        वर्गाच्या भिंती पोकळ असतात.म्हणून आम्ही सर्व बाजूने दिसेल व मोकळ्या असतील अशा वर्गांची रचना केल्याचे त्यांनी सांगितले.विषयाच्या भिंती कृत्रिम आहेत.त्या आपण  पाळल्या पाहिजेत  दिसणाऱ्या न दिसणाऱ्या भिंती देखील पडल्या  की खुलेपणाने मुलं शिकतात व आपणास काम करता येते असे त्यांनी यावेळी सांगितले.त्यांच्या गर्डेलवाडी,जातेगाव या शाळांचा प्रवास देखील त्यांनी आम्हाला शिक्षकांसमोर ठेवला.
             वाबळेवाडी काम उभं करताना मी गावतल्या लोकाना  बरोबर घ्यायचो.त्यामुळे काय करतोय ते काम पहात व या कामावर काम करताना लोकांचा आपल्यावर विश्वास  वाढत गेला.वारे सर सांगत होते.अडचणी, प्रश्न आमच्यापुढेही होते.पण फरक इतकाच की आम्ही आमच्या पद्धतीने त्यावर उत्तरं शोधली आणि पुढे गेलो.यात पालकांचा सिंहाचा वाटा आहे.कारण आजवर आम्ही जेंव्हा-जेंव्हा हाक दिली.तेंव्हा तेंव्हा आमच्या मदतीला पालक उभे राहिले.आणि आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला मदत केली.निवडणुका या गावातही होतात पण शाळा ही सर्वांची आहे आणि सर्वांसाठी आहे.हे गावकर्‍यांनी समजून घेतलं म्हणूनच हे साध्य झालं.
           या शाळेत पालकांचा सक्रीय सहभाग असतो.एखादी गोष्ट एखाद्या पालकांना उत्तम येत असल्यास ती ते मुलांना शकतात.वर्गातील चांगली मुलं इतरांना शिकू शकतात,हेच तत्व लोकांसोबत काम करताना त्यांची पद्धत शिकत गेल्याचे सांगितले.मागच्या अनुभव जमेला येतात व नवीन घडते.हे घडत असताना अनुभवांचे टेक्निक मी वापरत गेलो.शाळेतील गुणवत्ता वाढविण्यासाठी बारा विषय मित्र तयार केलेत.तसेच ज्या वर्गात आहोत त्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्गाचा अभ्यासाचे उद्दिष्ट ठेवायच्या कल्पना आम्ही प्रत्यक्षात राबत गेल्याचे फलित सांगितले.
वारे सरांचं म्हणणं आणि त्यांचा हाच विनम्र आत्मविश्वास हा खर्‍या अर्थाने या शाळेचा कणा आहे. वाबळेवाडीत या वर्षीही जागांच्या तिपटीपर्यंत प्रवेश अर्ज आले.अनेक मुलं अशी आहेत ज्यांना इंग्रजी, सीबीएसई शाळांतून काढून पालकांनी वाबळेवाडीच्या या शाळेत घातलं आहे, आणि लांबलांबहून इथे ती येतात.
             सात वर्षात रोज नवीन काम केले.शाळेत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय भाषा शिकण्याचे प्रयोग त्यांनी यावेळेस कथन केले.फ्रांस भाषा शिकण्याची सुरुवात बॅन्जो चा उलगडां व फ्रेंच जर्मन जापनीज या भाषा शिकवण्यामागील उद्देश त्यांनी सांगितले.भाषा यायला लागली की संस्कृती कळते.संस्कृती कळल्यामुळे शब्दसाठा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.जेवढ्या भाषा मुल शिकतील तेवढ्या मेंदूला आयाम येत असतात.त्याचबरोबर कमी वेळात अभ्यासक्रम कसा शिकविला जातो.ह्या प्रश्नावर त्यांनी मुलांच्या वेगाने शिकवलं की कमी वेळेत अभ्यासक्रम शिकवला जात असल्याचे सांगितले.शाळेतील शिकण्याची एकात्मक पद्धती,संधी व स्वातंत्र्य.भाषेला पुस्तकच नसावेत या गोष्टी त्यांनी सांगितल्या.
          आज महाराष्ट्रातील अनेक शाळांनी वाबळेवाडीच्या शाळेसारखी शिक्षणपद्धती अवलंबत  आहेत.असं म्हणायला हवं की सकारात्मकता ही संसर्गातूनच पसरते, त्याचे डोस देता येत नाहीत.शिक्षणातली ही सकारात्मकता महाराष्ट्रात नक्कीच पसरेल, परंतु शाळांच्या आधीही शिक्षकांनी त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे.म्हणुन हि भेट प्रचंड प्रेरणा दाई ठरली. शक्य असल्यास सर्वानी या शाळेला भेट द्या आणि सहसा शाळेत जाताना मुलांच्या चेहर्‍यावर न दिसणारा आनंद बघा.या शाळेत येऊन गेल्यावर आमच्यासारखंच तुम्हालाही कदाचित विद्यार्थी म्हणून पुन्हा एकदा 'अशा' शाळेत जावंसं वाटेल.

           शेवटी आमचे सहकारी शिक्षकांनी वारे गुरुजींना तुम्हाला अजुन पुढे या शाळेसाठी काय करायचे आहे.हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी अतिशय समर्पक व सुंदर उत्तर दिले.”जी मुलं माझ्यावर माझ्या शिक्षकांवर विश्वास ठेवून आली त्यांना जगातील सर्वोत्तम शाळा द्यायची असल्याचा विश्वास वारे गुरुजींनी व्यक्त केल्यावर मनातुन पुन्हा त्यांच्या कार्याला सलाम करावासा वाटला व केला.
त्यांतर  इतर अनेक गोष्ठी शाळेच्या पाहिल्यात.सन्मा शिक्षणाधिकारी डॉ वीर मॅडम यांनी वाबळेवाडी दाखवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.वारे गुरुजींच्या उत्तरासारखीच माझ्या शाळेतील लेकरांना सर्वोत्तम शाळा द्यायची प्रेरणा या ठिकाणाहुन घेतली.

खंडु नानाजी मोरे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फांगदर
ता देवळा.जिल्हा नाशिक.

4 comments:

  1. दादा....अतिशय सविस्तर वृत्तांकन आणि अप्रतिम शब्दांकन!👌👍💐

    ReplyDelete
  2. अनेकविध पैलु ऊघडुन शाळाविकासाचे पर्व शब्दबद्ध केलेत मित्रा.अतिशय बोलके संस्कारक्म गुरुकुल आपल्या शब्दांजलीतुन अनुभवायला मिळाले,समाजसहभाग व लोकचळवळ यांचे आदर्श ऊदाहरण यापेक्षा वेगळे राहुच शकत नाही.असे शिक्षक व समाज ऊदयास येवुन असे पवित्र ऊभे राहत असलेले काम पाहुन भारताचे भविष्य ऊज्वल आहेची प्रचिती येते..आनंद अभिमान वाटत आहे आणि विशेष असे करावे ही ज्योत पण जागृत झाली आहे,मरावे परि किर्ती रुपी ऊरावे ..असे ऐतिहासिक लक्षवेधी कार्याने शिक्षकांचे जीवन संजीवण झाले आहे...
    आचार्य चाणक्यांचे ते वाक्य या शिक्षकबांधवांनी पूश्च एकदा अजरामर ठरवले..
    शिक्षक कभी भी साधारण नही होता,ं"प्रलय" ओर "निर्माण" ऊसकी गोद मे खिलते है!
    एक समृद्ध अनुभवलेखन.
    बढिया..

    ReplyDelete