Monday, May 6, 2019

अक्षय तृतीया हा खानदेशातील महत्त्वाचा सण. खंडू मोरे,नाशिक.

अक्षय तृतीया हा खानदेशातील  महत्त्वाचा सण.
खंडू मोरे,नाशिक.

उत्तर महाराष्ट्रातील खानदेशच्या संस्कृतीत दिवाळी व आखाजीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त खानदेशातील एक महत्त्वाचा सण खान्देशात त्याला आखाजी म्हणून संबोधले जाते. सासुरवाशीन म्हणजे गौराई आणि जावई म्हणजे शंकर अशा या गौराई आखाजीला माहेरी येतात.

 माहेरी त्यांचे कोडकौतुक केले जातं. आमरस पुरणपोळीचे जेवण व शेतात झाडांना झोके बांधून आखाजीची गाणी गप्पा गोष्टी असं चित्र खानदेशातल्या ग्रामीण भागात पूर्वी मोठ्या प्रमाणावर दिसत असे आजही थोड्याफार प्रमाणात हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होताना दिसतो अशा या सणाची ओळख.

   चैत्र पौर्णिमेला गवरायीची स्थापना केली जाते.आखाजीच्या दिवशी या चैत्र गौरीचे विसर्जन केले जाते.याच दिवशी तृतीयेला   आखाजी हा सण साजरा केला जातो.

 मातीची घागर व मातीचे १ लोटे कुंभाराकडून विकत आणले जाते. हि घागर व लोटे पाण्याने पूर्ण भरून त्यावर खानदेशी मांड्याची पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला जातो. याबरोबरच भात, सार, कुरडया, आंब्याचा रस असे सुग्रास जेवण बनवले जाते. घराघराच्या दरातील झाडांना झोके बांधले जातात. झोक्यावर बसणाऱ्या सासुरवासिनी गौराईची व आखाजीची गाणे म्हणत झोके घेतात.

चैत्र महिन्यात असणारे ऊन,त्याचा आशय असणारे एक गीत नेहमी आखाजीला म्हटले जाते ते अशे ------


चैत वैशाख न उन्ह वं  माय

खडकं तापी जयात लाल वं  माय 

गौराईना पायले वनात फोड वं  माय

गौराईन्या बेगडी वाहणा वं माय

तठे काय कन्हेरन झाड वं माय.

कसमादे भागात व खानदेशात असणारे रणरणते ऊन त्याचा होणारा त्रास तसेच गौराई वरची श्रद्धा या गाण्यातून आपणास दिसते. उन्हाळ्यात येणारा हा सण त्यात आंब्यांचा हा हंगाम असतो.वाऱ्यावर झोके घेणाऱ्या या कैऱ्यावर आधारित अजून एक गाणे म्हटले जाते ते पुढीलप्रमाणे


आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाये वं.

कैरी तुटी न खडक फुटणा झुळझुळ पाणी वाहे वं.

झुळझुळ पाणी वाहे तठे कसाना बझार वं.


झुळझुळ पाणी वाहे तठे बांगड्यास्ना बझार वं.


  एप्रिल व मे महिन्यात आंब्याचा बहर असतो व ह्याच वेळी घरात गौराई बसविली जाते त्याचा पूर्ण आशय या गाण्यात येतो.

गौराई व शंकर यांची एकत्रित नावे गुंफून हि काही गीते म्हटली जातात. या गाण्यात आखाजीचे दिवस संपल्याचा उल्लेख येतो. गौराईचे विसर्जन होण्याची वेळ येते. म्हणजे सासुरवाशिणीची सासरी परतायची वेळ होते. गौराईचा नवरा तिला रथ घेऊन घ्यायला येतो त्या अर्थाचे वर्णन या गीतात येते.


गडगड रथ चाले गौराईना बहुतेक आनंदना.

सोळा साखळ्या रथले अन बावन खिडक्या त्याले .

गौराई  बसनी  रथमझार चिंता शंकरले.

अशी अनेक गाणी गाऊन उन्हाळ्यातील या सणाचा गोडवा द्विगुणीत केला जातो.घरातील आबालवृद्ध या सनात सणामध्ये सहभागी होतात. लहान मुलांना उन्हाळ्यात भरपूर सुट्ट्या असतात. आजच्या स्पर्धेच्या युगात वर्षभर मुलांच्या शाळेमुळे माहेराला सासुरवाशीण स्रियांना जायला जमत नाही. पण हि दीर्घ सुट्टी असल्याने व उन्हाळ्यात कामांचे प्रमाण कमी असल्याने सार्वजन एकत्र जमतात व या गोड सणाची मजा लुटतात.

 सासुरवाशीन गौराई सासरी जातांना निरोप घेतांना तिच्या आईच्या व तिच्या डोळ्यात अक्षरश पाणी येते. आता मोठा सन हा फक्त दिवाळीचाच आहे. म्हणजे सहा महिने भेट होणार नाही याचे दुख तिला वाटते.दाटून आलेला कंठ व भरल्या आवाजात ती म्हणते कि माझ्या भावाला तू पाठवू नको. रस्त्याने दाट अशी आमराई आहे. आमराईत दाट अश्या जंगलात त्याचा जीव घाबरेल अशे ती सांगते व मोठ्या भावाला दिवाळीला ग्यायला पाठव असे ती सांगते.


आखाजी दिवाळी सा महिनानी लाम्हन .जमनं ते मझार दसरा जमीन.


अश्या प्रकारे आखाजी या सणाला कसमादेत आबालवृद्ध मज लुटतात. पूर्वी रहदारीची साधने कमी होती. प्रसार माध्यमे नव्हती. करमणुकीची साधने अजिबातच नव्हती. जागतिकीकरणाची वारे वाहत नव्हते. पण आज काळ बदलला, मानसे बदलली, पण सणाचे महत्व काहीका असेना परंपरेने अबाधित ठेवले. त्यामुळे नात्यातील गोडवा व ग्रामीण शहरीतला एकत्रितपणा आपल्याला दिसून येतो. 

No comments:

Post a Comment