अहिराणी लोकगीतातील आई सप्तशृंगी
"सप्तशृंग" म्हणजे सात डोंगरांचा समुदाय, नांदुरीजवळ असणार्या पर्वतरांगेला "सप्तशृंग" असे म्हटले जाते. त्यापैकी एका शिखरावर या देवीचे वास्तव्य आहे. "सप्तशृंग" स्थळी वास्तव करते ती "सप्तशृंगी" साडेतीन पीठांपैकी हे अर्धे पीठ आहे. शेजारी मार्कंडेय पर्वत आहे. पर्वतावर मार्कंडेय ऋषींचा आश्रय होता. आदिशक्तीला तप करून त्यांनी प्रसन्न करून घेतले होते.
ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात १७५५ व्या ओवीत "सप्तशृंगी" देवीचा उल्लेख आढळतो.
तो मत्सेन्द्र सप्तशृंगी ।
भग्नावया चौरंगी ।
भेटला कि तो स्वर्गाशी ।
संपूर्ण झाला ।
अशा या अर्धेपीठ असणाऱ्या आदिशक्ती "सप्तशृंगी" देवीचे वर्णन अहिराणी लोकगीतामध्येही विवेचक, वेधक व निसर्गरम्यतेने रेखाटलेले आढळते.
द
याळू सप्तशृंगी वं माय तेलनी ।
खानदेश तून माहेर वं माय तेलनी ।
कोकण तून सासर वं माय तेलनी ।
डोंगरले दीधा येढा वं माय तेलनी ।
सप्तशृंगी देवीचे माहेर हे खान्देशचे असून जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी कोकणा समाजाची वसाहत मोठ्या प्रमाणात राहत असल्याने ह्या भागाला कोकण असे संबोधले जाते. नांदुरीचा या भूभागाला पण कोकणच संबोधले जाते. हेच कोकण हे "सप्तशृंगी" देवीचे सासर आहे."सप्तशृंगी" डोंगराला तू मायावी रूपाने वेढा दिला आहे असा उल्लेख या गीतात आढळतो. देवीची मान किंचीत वाकडी आहे याची कारणमीमांसा एका गीतात आहे ती अशी
सप्तरशिंगी माय वाकडी वं तुनि मान ।
खानदेश माहेर तिकडे वं तूनं ध्यान ।
देव मजार देव ही भवानी आभंड ।
दैतना मांघे पाडी डोंगरले खिंड ।
"सप्तशृंग" डोंगरासमोर असणार्या एका डोंगराला दैत्याच्या पाठीमागे धावतांना लाथ मारल्यावर खिंडार पडले आहे जे आजही पुरावा म्हणून आपणास दिसते असा लोकांचा समाज आहे. खान्देशातील माहेराकडे तू बारकाईने ध्यान देतेस म्हणूनच मान वाकडी केली आहे असा उल्लेख यामुळेच या गीतात आलेला आहे.
सप्तरशिंगी माय गडवरली पिवळी ।
तिना दंडवर अठरा भूजानी काचोळी ।
या देवीला एकून अठरा भुजा आहेत व तिने परिधान केलेली काचोळीसुद्धा अठरा भुजांचीच आहे. एका गीतात हा गड चढायला फार अवघड आहे, असा उल्लेख आढळतो.
सप्तरशिंग्या गड चढता चढायेना ।
मायना पायखाल उभा दैत गाडायेना ।
हा गड खूप उंच आहे त्यामुळे चढवला जात नाही. नंदुरीपासून पायी जाने पूर्वी फार जिकीरीचे होते आज बस गडावर जाते. त्यामुळे फक्त गडावरच्या पायर्या चढाव्या लागतात. तरीही वृद्ध व स्रियांना फार त्रास होतो. डोंगर, दर्या,दाट वेळूचे वन, फुले, हजारोंची वानरसेना, कड्याकपारीतून झिरपणारे नितळ पाणी अशा स्वर्गस्थानी आई सप्तशृंगी विसावली आहे.
No comments:
Post a Comment