Sunday, August 23, 2020
कसमादेत भालदेव पूजनाची परंपरा आजही टिकून
कसमादेत भालदेव पूजनाची परंपरा आजही टिकून.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोळा साजरा
केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी भालदेव उत्सवाला प्रारंभ होतो.खानदेशात परंपरागत चालत आलेली अनेक सण-उत्सव आजही तितक्याच उत्साहाने
साजरे केले जातात.
भारतीय संस्कृतीत दगडालाच नव्हे,तर शेणालाही पुजले जाते.यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कसमादेतील भालदेव सण.भालदेव उत्सवाची अनोखी परंपरा ग्रामीण भागात आजही
टिकून आहे.
ग्रामीण भागात घरोघरी भालदेवाचे पूजन केले जाते.पंचमी भालदेवाचे विसर्जन केले जाते.खानदेशात ग्रामीण भागात पोळ्यापासून ते दिवाळीपर्यंत स्थानिक सण-उत्सवाची रेलचेल असते.या सणाची कुठल्याच दिनदर्शिकेत नोंद नसते.पण हे सण रूढी-परंपरा जोपासताना परस्परांत स्नेह निर्माण करतात. एकसंधपणाची भावना त्यातून निर्माण होते.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोळा साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी भालदेव उत्सवाला प्रारंभ होतो.भारत कृषिप्रधान देश असल्यामुळे दुभत्या पशूंना देव मानण्याची परंपरा आहे.त्या देवतांची पूजा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.
*असा होतो साजरा सण*
कसमादेत भालदेव उत्सव साजरा करण्याची अनोखी पद्धत पूर्वापार सुरू आहे.श्रावण अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी भालदेवाची विधिवत स्थापना केली जाते.आपल्या घरच्या म्हैस,गाय या जनावरांचे शेण व घरातील केर कचरा,चुलीतील राख आवरून अंगणात तुळशी वृंदावनाजवळ एका ठिकाणी टाकले जाते.स्थापनेच्या दिवसापासून पाच दिवस सर्व घाण याच ठिकाणी टाकले जाते.भालदेव बसवल्यानंतर (आगमना नंतर)घरातील कुठलीही वस्तू विकली जात नाही.किंवा बाहेरही जाऊ दिली जात नाही.त्यामुळे एक प्रकारे सर्वच व्यवहार ठप्प होतात.पुर्वी या पाच दिवसाच्या काळात पैसे देखिल या पाच दिवसात दिले जात नव्हते.
या पाच दिवसात दुभत्या जनावरांचे संपूर्ण दूध घरातच ठेवले जाते.दुधापासून दही,ताक,बनविले जाते.परंतु हे दुधाचे पदार्थ दुसऱ्याच्या घरी देता येत नाही.
*पूजेची अनोखी पद्धत*
ज्याच्या घरी दुभती जनावरे आहेत त्याचा ओला भालदेव व ज्याच्याकडे दुभती जनावरे नसतील त्याच्याकडे कोरडा भालदेव असतो.भालदेव उत्सव कसमादे भागात पाच दिवसांचा साजरा केला जातो.मात्र खान्देश्यात तो सात नऊ दिवसाचा बसवतात.शेवटच्या दिवशी आवळीच्या गोंडे,फुले,मोहळ या वनस्पती, या भालदेवाजवळ सारवून या समोर गायीच्या शेणाचे गायक्या,म्हैसक्या,बैलक्या हे जनावरे चारणारे गवळी तयार करून ठेवले जातात.त्यावर पांढऱ्या रंगाचे दगड किंवा कवड्या ठेवल्या जातात.पूजेसाठी आवळीची पाने व लव्हाळी आणली जाते.या फुलांची या भालदेवावर झोपडी करून पोत्याचे बारदान टाकले जाऊन भालदेवावर दूध-भात शिंपडून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविले जातो.या सर्वांची विधिवत पूजा केली जाते.
पूजा झाल्यानंतर पाच वाट्या दही,दुधाची खीर हि पाच घरात वाटली जाऊन पंचमीच्या दिवशी या विधिपूर्वक पूजनानंतर भालदेवाचे विसर्जन केले जाते.हि परंपरा आज हि कसमादेतील काही गावांमध्ये आजही विधिवत जोपासली जाते.आमच्या घरात आमची आई कासुबाई,चारही काकू यशोदाबाई,सिंधुबाई,सुनंदाबाई,बायजाबाई ह्या सर्व काकू तसेच गावातील जवळपास सर्वच घरात विधिवत केली गेली. या वारशाचे संवर्धणासाठी कुटुंबातील महीला व मुलीनीं माहिती होण्यासाठी पूजन तसेच पूजेची पद्धती माहिती करून घेतल्या.
खंडू मोरे,खामखेडा नाशिक ९४२३९३२६९८.
Subscribe to:
Posts (Atom)