नवरात्रोत्सवातील चक्रपूजा खान्देशसह कसमादे पट्ट्यात उत्साहात होतेय साजरी
खंडु मोरे,
नवरात्रोत्सवात साधारण घटस्थापनेनंतर कसमादे परिसरात तिसर्या ते चौथ्या माळेनंतर पारंपरिक पद्धतीने चक्रपूजेचे आयोजन अनेक घरांमध्ये करण्यात येते. तिसऱ्यामाळेपासून कसमादे परिसरात चक्रपुजेची लगबग सुरु झाली आहे. हि चक्रपूजा करण्याची प्रथा आपल्या पूर्वापार चालू आहे. सर्व नातेवाईक, इष्ट मित्र यांनी एकत्र येउन हा चक्रपुजेचा उत्सव साजरा केला जातो. चक्रपूजेच्या दिवशी त्या परिवारातर्फे आपले सर्व भाऊबंद, नातेवाईक व मित्रमंडळांना जेवणाचे आमंत्रण देण्यात येते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून काही घरांमध्ये भाविकांची वर्दळ दिसून येत असून सुवासिक खाद्य पदार्थांचा सुवास दरवळत असल्याचे दिसून येत आहे.
चक्रपूजा केल्याने आपल्यावर देवीमातेची कृपा राहाते. कोणत्याही आपत्तीच्या चक्रात अडकत नाही. पुरातन काळापासून सुरू असलेली नवरात्रोत्सवातील चक्रपूजा खान्देशसह कसमादे पट्ट्यात उत्साहात साजरी करण्यात येते. यावेळी घरांघरातून ‘अग्या हो, तिसरा अग्या हो’ हा गजर ऐकायला मिळट आहे.नवरात्रीतील पाचव्या, सातव्या, आठव्या व नवव्या माळेला ही पूजा गावोगाव केली जाते.
नवरात्रीच्या दहा दिवसांमध्ये कसमादेतील प्रत्येक घरांमध्ये उत्साह व चैतन्याचे वातावरण पसरले असते. घरांमध्ये देवीची स्थापना करून गहू मातीत टाकून घट बसविण्यात येतात. दररोज महिलावर्ग घटाची मनोभावे पूजा करीत असतात. नागरी किकरणाच्या लोंढ्यात शहरात राहायला आलेल्या काही देविभक्तानीही चक्रपुजेची सुरुवात आता सुरु केली आहे. नाशिक मधील नवीन नाशिकच्या भागातही चक्रपुजेची धावपळ आपणास दिसते. या शहरातील काही घरांमध्ये घटस्थापनेच्या पाचव्या माळेपासून (पाचव्या दिवसानंतर) चक्रपूजा करण्यात येतात. आपल्या पारंपरिक कुळदैवतेला म्हणजे तुळजाभवानी, सप्तशृंगी देवी, महलक्ष्मि देवी, मोहटादेवी, रेणुकादेवी यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन या पूजेला येण्याचा मान दिला जातो.
ज्या ठिकाणी चक्रपूजा करायची ते स्थान गायीच्या शेणाने सारवून गोमुत्र टाकून पवित्र केले जाते..या जागेवर चाफ्याची पाने ठेवून कापूर प्रज्वलित केला जातो. मग त्या जागेवर पूजेची काही वेगळ्या पद्धतीची मांडणी करण्यात येते. चक्र कुटुंबप्रमुखाकडून काढण्यात येतात. या पूजेसाठी पाच व्यक्ती समोरासमोर बसतात.तांदूळ हे कुंकवात भिजवून लाल केले जातात. मग तांदूळ, उडीददाळ, हरभरा दाळ, यांची गोलाकर आकारात मांडणी करण्यात येते. चक्राच्या चारही दिशेला दरवाजे तयार केले जातात. या मांडणीत चारही दिशेला मारुतीरायाची स्थापना करतात. त्याची राख, मीठ, हळद, तांदूळ आदि पदार्थांपासून मारुतीची प्रतिकृती काढून मनोभावे पूजन करतात. .या नऊ राशींच्या चक्रामध्ये नंतर आंबा, रामफळ, सीताफळ, पेरू, लिं बू अश्या झाडांची पत्री टाकून हि पूजा झाकण्यात येते. या पानांवर अकरा किंवा एकवीस अश्या एकीत पुरणांच्या पोळ्या (मांडे) नैवेद्य म्हणून ठेवतात.
त्या पोळ्यांवर कुरडाया, सांजोर्या तसेच सोळया ठेवण्यात येतात व मध्य भागात मोठा दिवा लावण्यात येतो. हि पूजा करत असतांना एकजण तिथे मोरक्या असतो तो अग्या हो असे म्हणतो व बाकीचे सगळे झिलकरी असतात ते तिसरा अग्या हो असे म्हणतात. अश्या प्रकारे अर्ध्या ते १ तासाची हि पूजा होते. मध्यभागी असणार्या मोठ्या दिव्याला मेढ्या असे म्हणतात. ११ पोळीवर ११ दिवे लावले जातात. घटाच्या दिव्यावरून म्हणजेच घरात तेवत असलेल्या अखंड वाते वरून दिवे पेटवले जातात.
एक वात पेटवून मुख्य दिव्यावर ती वात धरून तो दिवा पेटवला जातो दिवा पेटल्यावर बोल आंबे कि जय असा सगळ्यांच्या गजरात देवीचा उद्घोष होतो जो आवाज १ किलोमीटर अंतरावर जातो व पूजा झाली याची इतरांना सूचना देतो. मग बाकीचे दिवे लावले जातात. देवीची आरती व भजने म्हणण्यात येतात. या मोठय़ा दिव्याचे वैशिष्ट्य असे की, जोपर्यंत मोठा दिवा सुरू आहे त्या दिव्याच्या उजेडात सर्व घरच्या सदस्यांना व उपस्थित पाहुण्यांनी जेवण (महाप्रसाद) करावयाचे असते. मोठा (दिवा) मालवण्याच्या आत जेवण महाप्रसाद ग्रहण करावा लागत असतो असे सांगण्यात येते. जेवण झाल्यावर हात ज्या पाण्यात धुतात ते पाणीसुद्धा कुठेही न फेकता लहानसे खड्डे खोदून त्यामध्ये टाकावे असा एक प्रघात आहे. त्यामुळे पूजा व प्रसादाचे पावित्र्य टिकून राहते असा एक समज आहे. नवरात्रीतील तिसर्या, पाचव्या,सातव्या, आठव् या व नवव्या माळेला ही पूजा गावोगाव केली जाते.
कुटुंबात हि चक्रपुजा दर तिस-या वर्षी करण्यात येते.काही कारणास्तव चक्रपूजा नवरात्रात झाली नाही तर कर अष्टमी (करआठव )या दिवशीही काही कुटुंब हि पूजा करतात किंवा पुढील वर्षी डब्बल चक्रपूजा केली जाते. दिवाळी, अक्षय्यतृतीया, द सरा या सणांप्रमाणेच चक्रपूजेला महत्त्व असून ती कुलदेवतेचे आगमन, आराधना, भक्ती व शक्तीची उपासना असल्याचे मानले जाते.
चक्रपूजेसाठी अकरा ओंजळ तांदूळ (त्यास मोती म्हणतात), अकरा कणकेचे दिवे, पेरू, सीताफळ, आंबे, चाफा , रामफळ, कापूर, उडीद, गुलाल, स मीधा, पाच नारळ या साहित्याबरोबरच अकरा पुरणपोळ्या (मांडे), पु-या, करंजा, कुरडया, सोळ्या , सांजोर्या, भज्या आदी साहित्य लागते. चक्रपूजा ही घटस्थापनेच्या ठिकाणी केली जाते. आलेले सर्व पाहुणे यानंतर प्रसाद ग्रहण करतात. बाजूला होम पेटवून विधिवत पूजा होऊन नवसपूर्ती करण्यात येते.