Friday, February 11, 2022
शिवाजी महाराज जयंती भाषण २
शिवाजी महाराज जयंती भाषण २
अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती.
शब्दही अपुरे पडती
अशी शिवरायांची कीर्ती।
राजा शोभुनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती ॥
19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस उजाडला. आणि अशा या मंगलक्षणी शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला आणि हेच आपले शिवाजी राजे. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवीत होत्या. अशा परिस्थितीत बलाढ्य सत्तांशी शूर मावळ्यांच्या साथीने झुंज देत शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. शिवराय हे जिजामाता आणि शहाजीराजे यांचे पुत्र.
शिवरायांना शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही. मात्र वीर जिजामातेने संस्कारांचे बाळकडू देऊन, राम, कृष्ण, भीम, अर्जुन अशा वीरांच्या गोष्टी सांगून छत्रपतींच्या मनाला, व्यक्तीमत्त्वाला आकार दिला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. घोडेस्वारी, दांडपटटा चालवणे, तलवारबाजी अशा अनेक विदया त्यांनी पारंगत केल्या. गनिमी काव्याने लढा देत पुरंदर, कोंढाणा, रायगड, प्रतापगड असे अनेक किल्ले जिंकले. स्वराज्याचा विस्तार केला.
पन्हाळगडाला वेढा, शायिस्ताखानाची फजिती, गड आला पण सिंह गेला, प्रतापगडावरील पराक्रम, बादशहाच्या हातावर तुटी दिल्या, आग्र्याहून सुटका अशा अनेक घटनांमधून त्यांचे असीम शौर्य, प्रसंगावधान, चातुर्य या गुणांचे दर्शन होते. शिवरायांच्या या इतर प्रवासात त्यांना जिवा महाला, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे अनेक शुरवीर मावळ्यांची अनमोल साथ मिळाली. शिवरायांनी नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. सर्वधर्मसमभाव, स्त्रियांप्रती आदरभाव या न्यायाने ते वागले आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले.शेवटी एकच म्हणावेसे वाटते....
किती आले, किती गेले .....केले मुघलांना हद्दपार ।
राजे बहु धरतीवरती
ना कुणा शिवबांची सर ॥
शिवाजी महाराज जयंती भाषण १
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,
सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा !
न काळवेळ तयांना लागे शत्रु धारातीर्थी पाडाया।
स्मरता शिवरायांचे शौर्य लागे इतिहास घडाया ॥
मध्ययुगीन काळात महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता हुकूमत गाजवीत होत्या. अशा कठीण परिस्थितीत 19 फेब्रुवारी 1630 उजाडला. रोजी सोन्याचा दिवस एक तारा शिवनेरीवर चमकला, जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला, मानाचा मुजरा करते छत्रपतींना, ज्यांनी स्वराज्य रूपी भगवा झेंडा रोवला.
शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली. शिवरायांना शहाजी राजांचा फारसा सहवास मिळाला नाही. जिजाऊंच्या सावलीत आणि संस्कारात बाळकडू घेत शिवरायांचे बालपण आकार घेत गेले. वयाच्या सातव्या वर्षापासून शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला त्यांनी अनेक विदया पारंगत केल्या. इ. स. 1640 मध्ये त्यांचा विवाह सईबाई यांच्या बरोबर थाटामाटात झाला व 1645 मध्ये रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची घोडदौड सुरु झाली.
त्याकाळी "ज्याचे किल्ले, त्याचे राज्य " हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी तोरणा किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचा श्रीगणेशा केला. नंतर कोंढाणा, पुरंदर, राजगड, जावळी असे किल्ले एक एक करत ताब्यात घेतले.एकामागून अफजलखान, सिद्दी जोहर, दिलेरखान,शायिस्तेखान, उदयभान अशा शत्रूशी लढताना शिवरायांच्या मावळ्यांनी गनिमी काव्याने लढा दिला आणि शत्रूवर विजय मिळवला. या सर्वांच्या प्रयत्नातूच हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी प्रत्यक्षात साकारले.
म्हणून म्हणावेसे वाटते... अशी करारी नजर सदा गनिमा भेदूनी पाही आरपार । शिवरायांमुळेच जाहले स्वप्न स्वराज्याचे साकार ॥
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय !
जय भवानी, जय शिवाजी
Sunday, August 23, 2020
कसमादेत भालदेव पूजनाची परंपरा आजही टिकून
कसमादेत भालदेव पूजनाची परंपरा आजही टिकून.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोळा साजरा
केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी भालदेव उत्सवाला प्रारंभ होतो.खानदेशात परंपरागत चालत आलेली अनेक सण-उत्सव आजही तितक्याच उत्साहाने
साजरे केले जातात.
भारतीय संस्कृतीत दगडालाच नव्हे,तर शेणालाही पुजले जाते.यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कसमादेतील भालदेव सण.भालदेव उत्सवाची अनोखी परंपरा ग्रामीण भागात आजही
टिकून आहे.
ग्रामीण भागात घरोघरी भालदेवाचे पूजन केले जाते.पंचमी भालदेवाचे विसर्जन केले जाते.खानदेशात ग्रामीण भागात पोळ्यापासून ते दिवाळीपर्यंत स्थानिक सण-उत्सवाची रेलचेल असते.या सणाची कुठल्याच दिनदर्शिकेत नोंद नसते.पण हे सण रूढी-परंपरा जोपासताना परस्परांत स्नेह निर्माण करतात. एकसंधपणाची भावना त्यातून निर्माण होते.
श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी पोळा साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या पहिल्या दिवशी भालदेव उत्सवाला प्रारंभ होतो.भारत कृषिप्रधान देश असल्यामुळे दुभत्या पशूंना देव मानण्याची परंपरा आहे.त्या देवतांची पूजा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो.
*असा होतो साजरा सण*
कसमादेत भालदेव उत्सव साजरा करण्याची अनोखी पद्धत पूर्वापार सुरू आहे.श्रावण अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी भालदेवाची विधिवत स्थापना केली जाते.आपल्या घरच्या म्हैस,गाय या जनावरांचे शेण व घरातील केर कचरा,चुलीतील राख आवरून अंगणात तुळशी वृंदावनाजवळ एका ठिकाणी टाकले जाते.स्थापनेच्या दिवसापासून पाच दिवस सर्व घाण याच ठिकाणी टाकले जाते.भालदेव बसवल्यानंतर (आगमना नंतर)घरातील कुठलीही वस्तू विकली जात नाही.किंवा बाहेरही जाऊ दिली जात नाही.त्यामुळे एक प्रकारे सर्वच व्यवहार ठप्प होतात.पुर्वी या पाच दिवसाच्या काळात पैसे देखिल या पाच दिवसात दिले जात नव्हते.
या पाच दिवसात दुभत्या जनावरांचे संपूर्ण दूध घरातच ठेवले जाते.दुधापासून दही,ताक,बनविले जाते.परंतु हे दुधाचे पदार्थ दुसऱ्याच्या घरी देता येत नाही.
*पूजेची अनोखी पद्धत*
ज्याच्या घरी दुभती जनावरे आहेत त्याचा ओला भालदेव व ज्याच्याकडे दुभती जनावरे नसतील त्याच्याकडे कोरडा भालदेव असतो.भालदेव उत्सव कसमादे भागात पाच दिवसांचा साजरा केला जातो.मात्र खान्देश्यात तो सात नऊ दिवसाचा बसवतात.शेवटच्या दिवशी आवळीच्या गोंडे,फुले,मोहळ या वनस्पती, या भालदेवाजवळ सारवून या समोर गायीच्या शेणाचे गायक्या,म्हैसक्या,बैलक्या हे जनावरे चारणारे गवळी तयार करून ठेवले जातात.त्यावर पांढऱ्या रंगाचे दगड किंवा कवड्या ठेवल्या जातात.पूजेसाठी आवळीची पाने व लव्हाळी आणली जाते.या फुलांची या भालदेवावर झोपडी करून पोत्याचे बारदान टाकले जाऊन भालदेवावर दूध-भात शिंपडून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविले जातो.या सर्वांची विधिवत पूजा केली जाते.
पूजा झाल्यानंतर पाच वाट्या दही,दुधाची खीर हि पाच घरात वाटली जाऊन पंचमीच्या दिवशी या विधिपूर्वक पूजनानंतर भालदेवाचे विसर्जन केले जाते.हि परंपरा आज हि कसमादेतील काही गावांमध्ये आजही विधिवत जोपासली जाते.आमच्या घरात आमची आई कासुबाई,चारही काकू यशोदाबाई,सिंधुबाई,सुनंदाबाई,बायजाबाई ह्या सर्व काकू तसेच गावातील जवळपास सर्वच घरात विधिवत केली गेली. या वारशाचे संवर्धणासाठी कुटुंबातील महीला व मुलीनीं माहिती होण्यासाठी पूजन तसेच पूजेची पद्धती माहिती करून घेतल्या.
खंडू मोरे,खामखेडा नाशिक ९४२३९३२६९८.
Thursday, December 12, 2019
शाळा विकास आराखडा
शाळा विकास आराखडा
खालील लिंक वरती जाऊन आपणास शाळा विकास आराखडा कोरा फॉरमेट मिळणार आहे.आपणास तो खालील दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करता येईल.
https://drive.google.com/open?Sunday, November 17, 2019
वाबळेवाडीची शाळा....प्रेरणादाई अनुभव.
वाबळेवाडीची शाळा....प्रेरणादाई अनुभव.
वाबळेवाडीच्या शाळेबद्दल सुपर थर्टी व सोशियल माध्यमातून
वेगवेगळ्या शाळांच्या भेटीच्या वृत्तांतातून वाचल्यापासून ती शाळा बघण्याची खूप
इच्छा आणि उत्सुकता होती.तिथली नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती समजून घ्यायची होती.तिथल्या
मुलांशी, त्यांना घडवणा-या शिक्षकांशी आम्हाला बोलायचं
होतं.त्यानुसार शिक्षणाधिकारी मा वीर मॅडम यांच्या मुळे शाळेला भेटीचा योग जुळून
आला.त्या भेटीचा हा सविस्तर वृतांत.
स्वप्नवत वाटणारी वाबळेवाडी शाळेच्या भेटीसाठी सुपर थर्टीच्या सर्व सदस्यामध्ये प्रचंड उत्सुकता, आनंद व आतुरता निर्माण झाली होती.ठरलेल्या
नियोजनाप्रमाणे भल्या पहाटे सव्वा तीनलाच घर सोडून नाशिकहुन नियोजना प्रमाणे सर्वजण निघण्यासाठी सज्ज झालो.मा शिक्षणाधिकारी वीर मॅडम यांनी शुभेछ्या देत प्रस्तान केले. 
पाच तासांच्या प्रवासानंतर आम्ही वाबळेवाडी शाळेस पोहचलो.पण प्रवास फारसा कळला नाही कारण आस आणि ओढ होती वाबळेवाडीची.
वाबळेवाडी शाळेत प्रवेश करताच आमचे आनंदाने स्वागत केले.या शाळेचा भूखंड तसा लहान आहे. पण असं असताना त्या जागेचा पुरेपूर आणि प्रभावी वापर केलेला आम्ही बघत होतो.पटांगणातील जमिनीवर विशिष्ट प्रकारे काढलेले अंक आणि अक्षरं, खांबांबर असलेली, खंड,नद्या,पर्वत,ऋतू, इत्यादींची माहिती.फरशांवर आखलेली कोष्टकं, तक्ते, या सगळ्यामुळे लहान जागेतही माहितीचं मोठं भांडार मुलांसाठी भरलेलं होतं.शाळेत मुलांना यावंसं वाटण्यासाठी शाळेतलं वातावरण तसं पूरक हवं, हा वारे सरांचा विचार ठिकठिकाणी दृश्य रुपात दिसतो.

पाच तासांच्या प्रवासानंतर आम्ही वाबळेवाडी शाळेस पोहचलो.पण प्रवास फारसा कळला नाही कारण आस आणि ओढ होती वाबळेवाडीची.
वाबळेवाडी शाळेत प्रवेश करताच आमचे आनंदाने स्वागत केले.या शाळेचा भूखंड तसा लहान आहे. पण असं असताना त्या जागेचा पुरेपूर आणि प्रभावी वापर केलेला आम्ही बघत होतो.पटांगणातील जमिनीवर विशिष्ट प्रकारे काढलेले अंक आणि अक्षरं, खांबांबर असलेली, खंड,नद्या,पर्वत,ऋतू, इत्यादींची माहिती.फरशांवर आखलेली कोष्टकं, तक्ते, या सगळ्यामुळे लहान जागेतही माहितीचं मोठं भांडार मुलांसाठी भरलेलं होतं.शाळेत मुलांना यावंसं वाटण्यासाठी शाळेतलं वातावरण तसं पूरक हवं, हा वारे सरांचा विचार ठिकठिकाणी दृश्य रुपात दिसतो.
शाळेच्या सविस्तर माहिती व्हावी म्हणुन
इमारतीच्या सभागृहात एकत्रित बसवत आम्हास माहिती मिळाली.आजच्या विद्यार्थ्यांना
पुढील काळातील आव्हाने काय राहणार आहे.यापुढील वीस वर्षात सध्या शिकत असलेल्या
मुलांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल.यासाठी वाबळेवाडीच्या शाळेत कार्य
सुरू आहे.जे व्हायचे आहे त्यासाठी सुरुवातीपासून तयारी ठेवत आतापासूनच कार्याला
लागा असे येथील ग्रामस्थ सतीश वाबळे यांनी आम्हा शिक्षकांना मार्गदर्शन करताना
सांगितले.
आमच्या शाळेचा स्वीडन या
देशाबरोबर करार झालेला असून त्या देशा पेक्षा आपली शिक्षण व्यवस्था वीस वर्षे मागे
असल्याचे त्यांनी सांगितले.वाबळेवाडीच्या शाळेत सहावीपासूनच फाउंडेशन कोर्सला
सुरुवात केली असून बारावीपर्यंत या शाळेत फाउंडेशन बॅचेस घेणारी राज्यातली पहिली
शाळा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अण्णानी वाबळेवाडीच्या इतिहास शिक्षकांना
सांगितला.सन 2012 मध्ये 32 पट असलेली ही शाळा दत्तात्रय वारे यांनी
अतिशय मेहनतीने उभी करत आज रोजी सहाशेहून अधिक विद्यार्थी सुसज्ज शाळेत शिक्षण घेत
असल्याचे सांगितले.सहा-सात वर्षे दोन शिक्षकांनी या शाळेची पायाभरणी केली.गुंठ्याला
दहा लाख अशी जमिनीला किंमत असताना ग्रामस्थांनी शिक्षकांच्या त्यांच्या कामावर
विश्वास ठेवत दीड एकर जागा शाळेला दिली. याठिकाणी मुलं स्वतः शिकत असल्याचे
त्यांनी सांगितले.
कुठलाही मुलगा
कोणत्याही मुलासोबत आमच्या शाळेत काम करतो.सर्व विद्यार्थ्यांना समान संधी दिली
जाते.शाळेतील विद्यार्थ्यांनी ट्रेकिंगला वोटिंग मशीन,कचराकुंडी वर काम करत
असल्याचे व प्रत्यक्ष विद्यार्थी कशी कृती करतात ते आम्हा शिक्षकांना सांगितले.शाळेला
मदत मिळण्यासाठी गावातील सांसस्कृतीक कार्यक्रम बंद करून शाळेच्या कामासाठी पैसा दिलेत.जत्रा
यात्रा सार्वजनिक गणेशोत्सव बंद करत या कार्यक्रमांसाठी खर्च होणारी संपूर्ण रक्कम
गावकरी शाळेसाठी देऊ लागले आहेत.चांगली जागा निर्माण करत नाही तोपर्यंत लोक
तुम्हाला मदत करणार नाहीत हा विश्वास या शिक्षकांनी त्यांच्या कामातून गावाला
दाखवल्याने भरीव अशी मदत गावाने शाळेला दिल्याचे त्यांनी सांगितले.
या
शिक्षकांनी लोक शाळेत आणण्याचे काम विविध उदाहरणांनी त्यांनी दाखवून दिले.देशाच्या
विकासाची सुरुवात शाळेपासून होते म्हणून गावाचे शाळेसाठी योगदान शाळेचे
बांधकाम लोकसहभागातून केल्याचे सांगितले.ह्या
शाळेच्या संपूर्ण वर्गखोल्या २२ फूट रुंद २२
फूट लांब.तसेच १४ फूट उंचीच्या पालक,ग्रामस्थ, स्वीडनच्या बॅंक ऑफ मेलॉनच्या सहकार्यातून निधी उपलब्ध करून शाळेस आठ
वर्गखोल्या पूर्ण पर्यावरणपूरक बांधल्या आहेत. आणि विशेष
म्हणजे एकाही वर्गात बेंच पहायला मिळाले नाहीत.
या अत्याधुनिक इमारतीवरून वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे
व्यवस्था करण्यासाठी शाळा बांधकाम पूर्वीच शालेय इमारतीखाली दीड लक्ष पाणीसाठा होऊ
शकेल एवढ्या पाण्याच्या टाक्या तयार केल्याचे साबळे अण्णा यांनी सांगितले. मुलं
शाळेत सकाळी लवकर येतात आणि मोकळेपणाने वावरणं शिकणं सुरू असतं. या ठिकाणी गुरुकुल
पद्धतीने शिक्षणाची सुरुवात केल्याचे देखील त्यांनी सांगितले. शाळेतील
विद्यार्थ्यांना संगीत विशारद,कोडींग प्रोग्राम,वेद हे शिक्षण व वेगळ्या संधी या
शाळेत मिळत असल्याचे सांगितले.एका विषयातून अनेक विषय शिकवायचे यासाठी देखील ते
वेगवेगळे प्रयोग करत असल्याचे सांगितले.उदाहरणादाखल कुटुंबातील कुटुंब वत्सल पणा व
नाती कळणं हे मुलांना गरजेचे आहे.म्हणुन मी आणि माझे कुटुंब या उपक्रमातून आम्ही
हे संस्कार विद्यार्थ्यांवर करत असल्याचे सांगितले. कुटुंब कळालं की कुठल्याच
मुलाच्या आई,वडील,आजी,आजोबा आधार आश्रमात जाणार नाहीत हे संस्कार रुजवण्यासाठी
आम्ही हा उपक्रम शाळेत राबवत असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांना संधी दिली.सगळे विषय
मुलांना दिलेत.ह्या विद्यार्थ्यांमधून संशोधक निर्माण व्हावेत यासाठी शिक्षकांचे
प्रयत्न सुरू असल्याचे देखील सांगितले.मुलाचा कल शोधला व संधी उपलब्ध करून देत
नवनवीन ज्ञान ,कौशल्य शाळेत मुलांना देण्यासाठी शिक्षक तत्पर असल्याचे त्यांनी
यावेळी सांगितले.त्याचबरोबर शिक्षकाने प्रत्येक शिक्षक जोपर्यंत शाळेकडे आई म्हणून
पाहात नाही.तोपर्यंत शाळेचे प्रश्न सुटणार
नसल्याचे दाखला त्यांनी दिला.शाळेकडे पाहतांना शिक्षकांची भूमिकाही आईची असली
पाहिजे.ही भुमिका शिक्षकाची असली तरच मुलाला काय अपेक्षित आहे.हे शिक्षकांना कळणार
हे त्यांनी विविध उद्धारनानी सांगितले.
स्वयं अध्ययनाची सवय जोपर्यंत मुलात निर्माण होत नाही.तोपर्यंत
मुल स्वता काही शिकू शकत नाही.म्हणून मुलं स्वयं अध्यापन करतील यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे
सांगितले.फाउंडेशन प्रोग्रामच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर झालेले विद्यार्थी
या शाळेत शिक्षक आहेत.या शिक्षकांचा पगार गावकरी करत असल्याचे त्यांनी सांगितले.शाळेचे
शिक्षक सचिन बेंडभर हे विद्यार्थ्यांना
जापनीज व फ्रेंच भाषा त्याचबरोबर इतर भाषा
शिकवत आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्यदायी
आहार मिळावा यासाठी खैरे सर मुलांना रोज आरोग्याच्या दृष्टीने
कोणता घटक शरीरास अधिक गरजेचा आहे.असा पोषक आहार कोणता असावा यासाठी
सर्व पालकांना मेसेज पाठवतात.त्याचबरोबर शाळेत ज्याचं मूल आहे त्याला शा पो आहार
शिजवायचं काम दिले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.या उपक्रमामुळे पिझ्झा बर्गर
खाणाऱ्या पालकांच्या मुलांनी त्यांच्या कुटुंबातून पिझ्झा-बर्गर हद्दपार केला ते
देखील सांगितले. वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा.आमच्या शाळेतील प्रत्येक
विद्यार्थ्याचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने आम्ही साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
चॉकलेट एवजी आम्ही विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या दिवशी गुळ शेंगदाणा चिक्की खारीक
हे शरीराच्या दृष्टीने पोषक घटक वाटायला लावतो.त्याचबरोबर शिक्षकाने रोज नवीन कल्पना
विद्यार्थ्यांना द्याव्यात.स्वतःची बुद्धी वापरून शाळेत शिकवावं.त्याचबरोबर
वेगवेगळ्या भाषा शिकणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वाबळेवाडीतील फक्त 50 ते 55 विद्यार्थी आहेत.अडीचशे-तीनशेच्या एवढी लोकसंख्या असलेल्या वस्तीवरील शाळेत आजूबाजूच्या
23 गावातील विद्यार्थी याठिकाणी येत असल्याचे त्यांनी
सांगितले. आठवड्यातील एक दिवस विद्यार्थी शाळा चालवतात.शाळेतील आठवीतील सनिया या
विद्यार्थिनीने आम्ही रोबोटच्या कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचे त्यांनी
सांगितले.शाळेतील 3d प्रिंटर,लेजर कटर,कोडींग लँग्वेज यासह
सुसज्ज ग्रंथालय व त्यातील जालणारे उपक्रम सांगितले.
पूर्व प्राथमिक वर्ग प्राथमिक
शाळेला जोडलेले असल्याने ह्या इयत्ता पहिलीच्या वर्गात पूर्व
प्राथमिकच्या वर्गातील बाईंशी, मुलांशी आम्ही बोलत होतो.तेंव्हा मुल दोन मात्र्याचे
शब्द करत होते.पहिलीची तयारी बालवाडीतच झाल्याने अवाक व्हायला लागले. त्या मुलांचा
धीटपणा बघून खूश व्हायला होत होतं.पूर्व प्राथमिकच्या बाई सांगत होत्या, 'आम्ही मुलांना कसलंही दडपण देतच नाही मुळी हे विशेष वाटलं. पूर्व प्राथमिक
वर्गाला लागूनच असलेलं शाळेचं स्वयंपाकघर इतकं नीटनेटकं होतं, की विश्वास बसत नव्हता. इथे एक गोष्ट सतत जाणवत होती ती म्हणजे कमालीची
स्वच्छता.
वर्ग पहातांना विद्यार्थ्यांनी
सांकेतिक भाषा डेव्हलप केल्याचे प्रात्यक्षिकातून सांगितले.पहिलीच्या वर्गापासून
विद्यार्थ्यांनी मंथन तसेच वेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्याचे जाणवले.दुसरीच्या
वर्गात संख्याज्ञान 15 ते 23 अंकी संके पर्यंत विद्यार्थी त्यांच्या
स्थानिक किंमत तसेच व्यवहारिक ज्ञान करत असल्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.या
वर्गातील सगळीच मुलं कविता करत असल्याचे निदर्शनास आले.विद्यार्थ्यांच्या 100
कवितांचं परिशस्पर्श हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध करत असल्याचे त्यांनी
सांगितले.कविता कशी तयार करावी.विद्यार्थ्यांची शब्दसाठा कसा वाढवावा यासाठीचे
उपक्रम त्यांनी सांगितले. मयंक मगर या विद्यार्थ्यांनी नाट्यछटा उपस्थितांना करून
दाखवली.ब्राह्मी लिपी लेणी मधली भाषा अंकांचा सराव कृतीवर भर विषय मित्र ह्या बाबी
या वर्गात पहावयास मिळालं.उत्साह, आणि आत्मविश्वास हे
दोन गुण प्रत्येक गोष्टीत इथली मुलं दाखवत होती.

हे वर्ग पहातांना जेवणाची सुट्टी होती.त्यावेळी मैदानावर आपल्याला कळलेलं आणि दुसर्याला न जमणारं असं सगळं त्याला स्वतःहून मुलं समजवून सांगताना मी पहिलीत.नेतृत्वगुण, व्यवस्थापन वगैरे कुठल्याही संज्ञा ठाऊक नसलेली मुलं हे सगळं आत्मसात केलेले मैदानावर पहिलीत.कबड्डी खेळतानाही मुलांमधला जोश बघून मी अनेक ठिकाणी मागे सरलो.मुलांचं असणारं लक्ष, पडणारे प्रश्न, त्यांनी दिलेली उत्तरं हे सगळं खूप छान होतं.काही मुल बॅडमिंटन खेळतानाही पहिला.
इथे विद्यार्थ्यांना शक्य असलेली प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून दिलेली दिसली.अनेक पुस्तकं,जवळजवळ प्रत्येक खेळासाठी लागणारी उपकरणं,अनेक वाद्यं, वैज्ञानिक उपकरणं,टॅबलेट्स,कॉम्प्यूटर असं सगळं या शाळेत आहे.वारे गुरजी म्हणाले, 'गोल्फ सोडून सगळ्या खेळांचं साहित्य इथे आहे. मुलांना सगळं काही उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.इथली मुलं अनेक खेळांमधे आणि कलांमधे पारंगत आहेत आणि त्याचं बरंचसं श्रेय वारे सरांना जातं.हे मोठ्या जिद्दीचं आणि त्याहूनही जास्त आत्मीयतेचं उदाहरण वारे सरांच्या रुपात या शाळेत आहे.
त्यांतर
शाळेच्या मुख्य सभागृहात दत्तात्रेय वारे गुरुजीनी शाळा उभारण्यासाठी चा प्रवास या वेळेस सर्व उपस्थितांना सांगितला.शाळा
उभारणीसाठी चळवळ म्हणून ग्रामस्थांनी काम केले.प्रत्येक ग्रामस्थाच्या दैनंदिनीत
शाळेसाठी योगदान हे काम रोजचेच ठरलेले असल्याने त्यांनी सांगितले.वाबळेवाडी वर
अलौकिक असामान्य उभ करण्यासाठी ग्रामस्थांचा मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी
सांगितलं.ज्याला उत्तर आहेत. त्याला प्रश्न म्हणायचं.आणि असे प्रश्न आम्ही सहज
सोडत असल्याने लोकांचा आमच्या कामावरचा विश्वास वाढला आणि हाच विश्वास आम्ही कधीही
कमी होऊ दिला नाही.
शिक्षकांचे मुलांवर प्रेम असले पाहिजे. शाळेवर व मुलांवर प्रेम असलं की आपण त्याचा
रात्रंदिवस विचार करतो. आणि त्याचा रात्रंदिवस विचार करतो ही आपोआप घडत असल्याचे
त्यांनी सांगितलं.काम कसं करायचं.मुलांना कसं शिकवायचं व सर्व मुले एकत्र येऊ
शकतात हे शिक्षकाला कळलं की आपोआप काम उभं रहात असल्याचे सांगितले.शाळेचं माध्यम मराठीच आहे, कारण आपली, मुलांची
मातृभाषा मराठी आहे. परंतु पहिलीपासून हिंदी व इंग्लिश या भाषा शिकवल्या जातात आणि
त्यामुळे मुलांना कुठेच भाषेची अडचण येत नाही.' याची प्रचीती
जेंव्हा पूर्व प्राथमिकच्याही मुलांनी इंग्लिशमधे आपली नावं सांगितली तेंव्हा
आलीच.
वर्गाच्या भिंती पोकळ असतात.म्हणून
आम्ही सर्व बाजूने दिसेल व मोकळ्या असतील अशा वर्गांची रचना केल्याचे त्यांनी
सांगितले.विषयाच्या भिंती कृत्रिम आहेत.त्या आपण पाळल्या पाहिजेत दिसणाऱ्या न दिसणाऱ्या भिंती देखील पडल्या की
खुलेपणाने मुलं शिकतात व आपणास काम करता येते असे त्यांनी यावेळी सांगितले.त्यांच्या
गर्डेलवाडी,जातेगाव या शाळांचा प्रवास देखील त्यांनी आम्हाला शिक्षकांसमोर ठेवला.
वाबळेवाडी काम उभं करताना मी गावतल्या लोकाना बरोबर घ्यायचो.त्यामुळे काय करतोय ते काम पहात व
या कामावर काम करताना लोकांचा आपल्यावर विश्वास वाढत गेला.वारे सर सांगत होते.अडचणी, प्रश्न आमच्यापुढेही होते.पण फरक इतकाच की
आम्ही आमच्या पद्धतीने त्यावर उत्तरं शोधली आणि पुढे गेलो.यात पालकांचा सिंहाचा
वाटा आहे.कारण आजवर आम्ही जेंव्हा-जेंव्हा हाक दिली.तेंव्हा तेंव्हा आमच्या मदतीला
पालक उभे राहिले.आणि आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला मदत केली.निवडणुका या गावातही
होतात पण शाळा ही सर्वांची आहे आणि सर्वांसाठी आहे.हे गावकर्यांनी समजून घेतलं
म्हणूनच हे साध्य झालं.
या शाळेत पालकांचा सक्रीय सहभाग असतो.एखादी गोष्ट एखाद्या पालकांना
उत्तम येत असल्यास ती ते मुलांना शकतात.वर्गातील चांगली मुलं इतरांना शिकू शकतात,हेच तत्व
लोकांसोबत काम करताना त्यांची पद्धत शिकत गेल्याचे सांगितले.मागच्या अनुभव जमेला
येतात व नवीन घडते.हे घडत असताना अनुभवांचे टेक्निक मी वापरत गेलो.शाळेतील
गुणवत्ता वाढविण्यासाठी बारा विषय मित्र तयार केलेत.तसेच ज्या वर्गात आहोत त्या
वर्गातील विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्गाचा अभ्यासाचे उद्दिष्ट ठेवायच्या कल्पना
आम्ही प्रत्यक्षात राबत गेल्याचे फलित सांगितले.
वारे सरांचं म्हणणं आणि त्यांचा हाच विनम्र आत्मविश्वास हा खर्या
अर्थाने या शाळेचा कणा आहे. वाबळेवाडीत या वर्षीही जागांच्या तिपटीपर्यंत प्रवेश
अर्ज आले.अनेक मुलं अशी आहेत ज्यांना इंग्रजी, सीबीएसई शाळांतून काढून
पालकांनी वाबळेवाडीच्या या शाळेत घातलं आहे, आणि लांबलांबहून
इथे ती येतात.
सात वर्षात रोज नवीन काम केले.शाळेत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय भाषा
शिकण्याचे प्रयोग त्यांनी यावेळेस कथन केले.फ्रांस भाषा शिकण्याची सुरुवात बॅन्जो चा
उलगडां व फ्रेंच जर्मन जापनीज या भाषा शिकवण्यामागील उद्देश त्यांनी सांगितले.भाषा
यायला लागली की संस्कृती कळते.संस्कृती कळल्यामुळे शब्दसाठा वाढत असल्याचे त्यांनी
सांगितले.जेवढ्या भाषा मुल शिकतील तेवढ्या मेंदूला आयाम येत असतात.त्याचबरोबर कमी
वेळात अभ्यासक्रम कसा शिकविला जातो.ह्या प्रश्नावर त्यांनी मुलांच्या वेगाने
शिकवलं की कमी वेळेत अभ्यासक्रम शिकवला जात असल्याचे सांगितले.शाळेतील शिकण्याची
एकात्मक पद्धती,संधी व स्वातंत्र्य.भाषेला पुस्तकच नसावेत या गोष्टी त्यांनी
सांगितल्या.
आज महाराष्ट्रातील
अनेक शाळांनी वाबळेवाडीच्या शाळेसारखी शिक्षणपद्धती अवलंबत आहेत.असं म्हणायला हवं की सकारात्मकता ही
संसर्गातूनच पसरते, त्याचे डोस देता येत नाहीत.शिक्षणातली ही
सकारात्मकता महाराष्ट्रात नक्कीच पसरेल, परंतु शाळांच्या
आधीही शिक्षकांनी त्यासाठी तयार असणं गरजेचं आहे.म्हणुन हि भेट प्रचंड प्रेरणा दाई
ठरली. शक्य असल्यास सर्वानी या शाळेला भेट द्या आणि सहसा शाळेत जाताना मुलांच्या
चेहर्यावर न दिसणारा आनंद बघा.या शाळेत येऊन गेल्यावर आमच्यासारखंच तुम्हालाही
कदाचित विद्यार्थी म्हणून पुन्हा एकदा 'अशा' शाळेत जावंसं वाटेल.
शेवटी
आमचे सहकारी शिक्षकांनी वारे गुरुजींना तुम्हाला अजुन पुढे या शाळेसाठी काय करायचे
आहे.हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी अतिशय समर्पक व सुंदर उत्तर दिले.”जी मुलं
माझ्यावर माझ्या शिक्षकांवर विश्वास ठेवून आली त्यांना जगातील सर्वोत्तम शाळा
द्यायची असल्याचा विश्वास वारे गुरुजींनी व्यक्त केल्यावर मनातुन पुन्हा त्यांच्या
कार्याला सलाम करावासा वाटला व केला.
त्यांतर इतर अनेक गोष्ठी शाळेच्या पाहिल्यात.सन्मा
शिक्षणाधिकारी डॉ वीर मॅडम यांनी वाबळेवाडी दाखवल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.वारे
गुरुजींच्या उत्तरासारखीच माझ्या शाळेतील लेकरांना सर्वोत्तम शाळा द्यायची प्रेरणा
या ठिकाणाहुन घेतली.
खंडु नानाजी
मोरे
जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा फांगदर
ता देवळा.जिल्हा
नाशिक.
Monday, October 7, 2019
नवरात्रोत्सवातील चक्रपूजा खान्देशसह कसमादे पट्ट्यात उत्साहात होतेय साजरी
नवरात्रोत्सवातील चक्रपूजा खान्देशसह कसमादे पट्ट्यात उत्साहात होतेय साजरी
खंडु मोरे,
नवरात्रोत्सवात साधारण घटस्थापनेनंतर कसमादे परिसरात तिसर्या ते चौथ्या माळेनंतर पारंपरिक पद्धतीने चक्रपूजेचे आयोजन अनेक घरांमध्ये करण्यात येते. तिसऱ्यामाळेपासून कसमादे परिसरात चक्रपुजेची लगबग सुरु झाली आहे. हि चक्रपूजा करण्याची प्रथा आपल्या पूर्वापार चालू आहे. सर्व नातेवाईक, इष्ट मित्र यांनी एकत्र येउन हा चक्रपुजेचा उत्सव साजरा केला जातो. चक्रपूजेच्या दिवशी त्या परिवारातर्फे आपले सर्व भाऊबंद, नातेवाईक व मित्रमंडळांना जेवणाचे आमंत्रण देण्यात येते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून काही घरांमध्ये भाविकांची वर्दळ दिसून येत असून सुवासिक खाद्य पदार्थांचा सुवास दरवळत असल्याचे दिसून येत आहे.
चक्रपूजा केल्याने आपल्यावर देवीमातेची कृपा राहाते. कोणत्याही आपत्तीच्या चक्रात अडकत नाही. पुरातन काळापासून सुरू असलेली नवरात्रोत्सवातील चक्रपूजा खान्देशसह कसमादे पट्ट्यात उत्साहात साजरी करण्यात येते. यावेळी घरांघरातून ‘अग्या हो, तिसरा अग्या हो’ हा गजर ऐकायला मिळट आहे.नवरात्रीतील पाचव्या, सातव्या, आठव्या व नवव्या माळेला ही पूजा गावोगाव केली जाते.
नवरात्रीच्या दहा दिवसांमध्ये कसमादेतील प्रत्येक घरांमध्ये उत्साह व चैतन्याचे वातावरण पसरले असते. घरांमध्ये देवीची स्थापना करून गहू मातीत टाकून घट बसविण्यात येतात. दररोज महिलावर्ग घटाची मनोभावे पूजा करीत असतात. नागरी किकरणाच्या लोंढ्यात शहरात राहायला आलेल्या काही देविभक्तानीही चक्रपुजेची सुरुवात आता सुरु केली आहे. नाशिक मधील नवीन नाशिकच्या भागातही चक्रपुजेची धावपळ आपणास दिसते. या शहरातील काही घरांमध्ये घटस्थापनेच्या पाचव्या माळेपासून (पाचव्या दिवसानंतर) चक्रपूजा करण्यात येतात. आपल्या पारंपरिक कुळदैवतेला म्हणजे तुळजाभवानी, सप्तशृंगी देवी, महलक्ष्मि देवी, मोहटादेवी, रेणुकादेवी यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन या पूजेला येण्याचा मान दिला जातो.
ज्या ठिकाणी चक्रपूजा करायची ते स्थान गायीच्या शेणाने सारवून गोमुत्र टाकून पवित्र केले जाते..या जागेवर चाफ्याची पाने ठेवून कापूर प्रज्वलित केला जातो. मग त्या जागेवर पूजेची काही वेगळ्या पद्धतीची मांडणी करण्यात येते. चक्र कुटुंबप्रमुखाकडून काढण्यात येतात. या पूजेसाठी पाच व्यक्ती समोरासमोर बसतात.तांदूळ हे कुंकवात भिजवून लाल केले जातात. मग तांदूळ, उडीददाळ, हरभरा दाळ, यांची गोलाकर आकारात मांडणी करण्यात येते. चक्राच्या चारही दिशेला दरवाजे तयार केले जातात. या मांडणीत चारही दिशेला मारुतीरायाची स्थापना करतात. त्याची राख, मीठ, हळद, तांदूळ आदि पदार्थांपासून मारुतीची प्रतिकृती काढून मनोभावे पूजन करतात. .या नऊ राशींच्या चक्रामध्ये नंतर आंबा, रामफळ, सीताफळ, पेरू, लिं बू अश्या झाडांची पत्री टाकून हि पूजा झाकण्यात येते. या पानांवर अकरा किंवा एकवीस अश्या एकीत पुरणांच्या पोळ्या (मांडे) नैवेद्य म्हणून ठेवतात.
त्या पोळ्यांवर कुरडाया, सांजोर्या तसेच सोळया ठेवण्यात येतात व मध्य भागात मोठा दिवा लावण्यात येतो. हि पूजा करत असतांना एकजण तिथे मोरक्या असतो तो अग्या हो असे म्हणतो व बाकीचे सगळे झिलकरी असतात ते तिसरा अग्या हो असे म्हणतात. अश्या प्रकारे अर्ध्या ते १ तासाची हि पूजा होते. मध्यभागी असणार्या मोठ्या दिव्याला मेढ्या असे म्हणतात. ११ पोळीवर ११ दिवे लावले जातात. घटाच्या दिव्यावरून म्हणजेच घरात तेवत असलेल्या अखंड वाते वरून दिवे पेटवले जातात.
एक वात पेटवून मुख्य दिव्यावर ती वात धरून तो दिवा पेटवला जातो दिवा पेटल्यावर बोल आंबे कि जय असा सगळ्यांच्या गजरात देवीचा उद्घोष होतो जो आवाज १ किलोमीटर अंतरावर जातो व पूजा झाली याची इतरांना सूचना देतो. मग बाकीचे दिवे लावले जातात. देवीची आरती व भजने म्हणण्यात येतात. या मोठय़ा दिव्याचे वैशिष्ट्य असे की, जोपर्यंत मोठा दिवा सुरू आहे त्या दिव्याच्या उजेडात सर्व घरच्या सदस्यांना व उपस्थित पाहुण्यांनी जेवण (महाप्रसाद) करावयाचे असते. मोठा (दिवा) मालवण्याच्या आत जेवण महाप्रसाद ग्रहण करावा लागत असतो असे सांगण्यात येते. जेवण झाल्यावर हात ज्या पाण्यात धुतात ते पाणीसुद्धा कुठेही न फेकता लहानसे खड्डे खोदून त्यामध्ये टाकावे असा एक प्रघात आहे. त्यामुळे पूजा व प्रसादाचे पावित्र्य टिकून राहते असा एक समज आहे. नवरात्रीतील तिसर्या, पाचव्या,सातव्या, आठव् या व नवव्या माळेला ही पूजा गावोगाव केली जाते.
कुटुंबात हि चक्रपुजा दर तिस-या वर्षी करण्यात येते.काही कारणास्तव चक्रपूजा नवरात्रात झाली नाही तर कर अष्टमी (करआठव )या दिवशीही काही कुटुंब हि पूजा करतात किंवा पुढील वर्षी डब्बल चक्रपूजा केली जाते. दिवाळी, अक्षय्यतृतीया, द सरा या सणांप्रमाणेच चक्रपूजेला महत्त्व असून ती कुलदेवतेचे आगमन, आराधना, भक्ती व शक्तीची उपासना असल्याचे मानले जाते.
चक्रपूजेसाठी अकरा ओंजळ तांदूळ (त्यास मोती म्हणतात), अकरा कणकेचे दिवे, पेरू, सीताफळ, आंबे, चाफा , रामफळ, कापूर, उडीद, गुलाल, स मीधा, पाच नारळ या साहित्याबरोबरच अकरा पुरणपोळ्या (मांडे), पु-या, करंजा, कुरडया, सोळ्या , सांजोर्या, भज्या आदी साहित्य लागते. चक्रपूजा ही घटस्थापनेच्या ठिकाणी केली जाते. आलेले सर्व पाहुणे यानंतर प्रसाद ग्रहण करतात. बाजूला होम पेटवून विधिवत पूजा होऊन नवसपूर्ती करण्यात येते.
Tuesday, July 2, 2019
फांगदर ता देवळ्याची जिल्हा परिषद शाळा भरणार रोव्हर चिप द्वारे थेट मंगळावर
https://khandumore34dreamsschool.blogspot.com/2019/07/blog-post.html
फांगदर ता देवळ्याची
जिल्हा परिषद शाळा भरणार रोव्हर चिप द्वारे थेट मंगळावर
खंडु मोरे,फांगदर
विमानात बसुन विध्यार्थ्यांना गगनाची सैर करून आणलेल्या
जिल्हा परिषदेच्या फांगदर ता देवळयाच्या शाळेतील विध्यार्थ्यांना थेट ‘मंगळ’ ग्रहावर भरणार आहे. शिक्षक खंडु मोरे
यांनी नुकतीच त्यासाठीचे शाळा,शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे
ऑनलाईन नोंदणी केली होती.त्याचे नुकतेच बोर्डिंग पास देखील आले आहेत…!!
मथळा आणि वरचा परिच्छेद वाचुन बुचकुळ्यात पडलात ना तर ‘नासा’ या जगतविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे ‘मंगळ रोव्हर 2020’हे अंतरिक्षयान‘मंगळावर झेपावणार आहे.या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे
पाठवून मानवी इतिहासातील दुसऱ्या ग्रहावर आपल्या पाऊल खुणा सोडण्याची ऐतिहासिक
संधी नासाच्यावतीने जगभरातील सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे.ह्या ही
मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहीमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला
उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत.
त्याअंतर्गत फांगदरच्या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी
शाळेतील पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व शाळेचेही नावे या
उपक्रमसाठी नोंदवले होते.त्याची ऑनलाईन आलेले बोर्डिंग पास नुकतेच मिळाले असुन
बोर्डिंग पासचे वाटप शाळेत व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबन मोरे,दिपक मोरे,सागर पवार,सोनजी
पवार यांच्या हस्ते करण्यात आले.शिक्षकांच्या या उपक्रमाचे कौतुक करत
विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
नासाच्या पसाडेना ,कॅलिफोर्निया येथील जेट
प्रोपुलशन लॅबोरेटरीतल्या ( JPL ) मायक्रोडिव्हायसेस
लॅबोरेटरी मध्ये इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिप वर मानवी केसाच्या
एक हजाराव्या भागाइतक्या (75 नॅनोमिटर) रुंदीत आपण
नोंदवलेली नावे स्टेन्सिल केली जाणार आहेत.इतक्या छोट्या आकारात एक डेमी आकाराच्या
चिपवर दहा लाख नावे मावतील.ह्या चिप रोव्हर वर काचेच्या आवरणाखाली जतन करून
मंगळावर पाठवल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या मनात अवकाश संशोधनाप्रती जागरूकता
निर्माण करणे आणि त्यांना या नव्या क्षेत्राची प्राथमिक माहिती व्हावी,तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या चिमुकल्यानी नावे
मंगळावर पाठवण्याची संधी मिळाल्याने आनंद होत असल्याचे संजय गुंजाळ यांनी
सांगितले.
रोव्हर 2020 हे यान ‘ऍटलस V 541 या रॉकेट च्या मदतीने
अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील कॅप कानावेराल इथल्या सैन्य दलाच्या तळावरून 17 जुलै2020 ते 5 ऑगस्ट 2020 मध्ये लॉन्च केले जाणार आहे.जे 2021च्या
फेब्रुवारी महिन्यात मंगळावर पोहचण्याची शक्यता आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नासा ही अवकाश संशोधन
क्षेत्रात काम करणारी संस्था ,मंगळ ग्रह त्या ग्रहावरची
नासाची चालू असलेली मोहीम आणि पाठवले जाणारे रोव्हर 2020 हे अवकाशयान यांची माहिती मिळेल.
सुनिता धनगर गटशिक्षण अधिकारी देवळा.
दैनिक लोकमंथनणे घेतलेली आमच्या उपक्रमाची दखल.
दैनिक महाराष्ट्र टाईम्सने घेतलेली आमच्या उपक्रमाची दैनिकाच्या पहिल्या पानावरील दखल.
दैनिक देशदूतने घेतलेली आमच्या उपक्रमाची दैनिकाच्या जिल्हा पानावरील दखल.
दैनिक पुढारीने घेतलेली आमच्या उपक्रमाची दैनिकाच्या जिल्हा पानावरील दखल.
Subscribe to:
Posts (Atom)












